रायगड -कोरोनाच्या महामारीमुळे आठ महिन्यांपासून सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. शासनाने नववी ते बारावीपर्यंत शाळा कॉलेज सुरू करण्यास परवानगी दिल्याने सोमवार 23 नोव्हेबर पासून शाळा, कॉलेजची घंटा वाजणार आहे. रायगड जिल्ह्यातही पनवेल वगळता नववी ते बारावीची शाळा सुरू होत आहे. पण तत्पूर्वी शाळा, कॉलेज सॅनिटाईझ करण्याची लगबग सुरू आहे. तर शिक्षकांची कोरोना तपासणीही केली जात असली तरी फक्त 20 टक्केच शिक्षकांची तपासणी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोमवारचा मुहूर्त टाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगडमध्ये शाळा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात शाळा, कॉलेजच्या वर्ग खोल्या झाल्या सॅनिटाईझ - मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर देशात टाळेबंदी लागू केली. शाळा, कॉलेज हे सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली. हळूहळू शासनाने सर्व व्यवहार पूर्ववत करण्यास परवानगी दिली. मात्र शाळा अद्यापही बंद होत्या. 23 नोव्हेबर पासून नववी ते बारावीची शाळा, कॉलेज सुरू होत आहेत. जिल्ह्यात पनवेल वगळता सर्व नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शाळा, कॉलेज सुरू होणार असल्याने वर्ग खोल्या सॅनिटाईझ केल्या जात आहेत.
कोरोनाचे नियम पाळून शिक्षण होणार सुरू -
शाळा कॉलेज सुरू होत असल्याने सर्व वर्ग हे निर्जंतुकीकरण केले जात आहेत. शाळेतील वर्गात सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक वर्गात 12 विद्यार्थी याना शिक्षक शिकविणार आहेत. शाळेत येताना, जाताना विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासणी केली जाणार आहे. सॅनिटायझर हाताला लावून प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी मास्क लावणे गरजेचे आहे. वर्ग भरताना आणि सुटताना दहा मिनिटांचे अंतर राहणार आहे. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. आजारी असलेल्या वा घरी कोणी आजारी असेल तर अशा विद्यार्थ्याना वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच शाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी थोरात यांनी दिली आहे.
शिक्षकांची कोविड तपासणी अद्याप अपूर्ण -
रायगड जिल्ह्यात नववी ते बारावीची शाळा सुरू होत असल्याने शिक्षकांची कोविड तपासणी केली जात आहे. आतापर्यत 20 टक्केच शिक्षकांची कोविड तपासणी पूर्ण झाली असून त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तर इतर शिक्षकाची तपासणी अजून झालेली नाही. त्यामुळे 24 ते 25 पासून जिल्ह्यातील शाळा, कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे.
पालकांची द्विधा मनस्थिती -
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत चालला आहे. त्यात आता कोरोनाचे नियम पाळून नववी ते बारावी शाळा, कॉलेज सुरू होत आहे. मात्र असे असले तरी पालकांची मनस्थिती द्विधा अवस्थेत सापडली आहे. पालकांना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न हा पालकांना पडला आहे.