रायगड -मराठा आरक्षणाबाबत छत्रपती खासदार संभाजीराजे हे किल्ले रायगडवरील शिवराज्यभिषेक सोहळानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार होते. शिवराज्यभिषेक सोहळा पार पडल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी राज्यकर्ते आणि विरोधी पक्षावर त्यांनी तोफ डागली. आरक्षण मिळेपर्यत गप्प बसणार नाही, असा इशारा छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे. तसेच 16 जूनपासून आंदोलनाची सुरुवात करणार असून यावेळी पहिली लाठी झेलण्यास मी पुढे असेल, असा सज्जड इशारा त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला दिला.
'पहिली लाठी झेलण्यास मी पुढे असेल' -
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. यामध्ये मराठा समाजालाही सामावून घेतले. मग आता बहुजन समाजातून मराठा समाज का वगळला गेला. मराठा समजाला आरक्षण मिळणे, हा हक्क आहे. तुमच्या भांडणात आम्हाला काही सोयरसुतक नाही, आम्हाला आरक्षण कसे देणार ते सांगा, असा प्रश्न त्यांनी केंद्र व राज्य सरकारला विचारला. तसेच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आता संयमी स्वभाव सोडणार आहे. न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता आंदोलन निश्चित असून 16 जून रोजी पहिले आंदोलन करणार आहे. न्याय न मिळाल्यास कोविड संपल्यानंतर समाज मुंबईत चालत येणार आहे. यावेळी पहिली लाठी झेलण्यास मी पुढे असेल, असा सज्जड इशारा राज्य सरकार आणि केंद्र सरकारला छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी किल्ले रायगडच्या राज सदरेवरून दिला आहे.
'अठरा पगड जातीला महाराजांनी एकत्रित आणले' -
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीला एकत्र आणण्यासाठी शिवराज्यभिषेक करून घेतला. 'स्वराज्य' हे 'सुराज्य' व्हावे हा यामागचा उद्देश महाराजांचा होता. बारा बलुतेदार जातीला त्यांनी एकत्रित करून सर्वांना न्याय दिला. छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला त्याकाळी आरक्षण दिले. त्यात मराठा समाजही होता. मात्र, आता मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला आहे. मराठा समाज हा वाईट परिस्थितीत आहे. मी गरीब मराठ्यांसाठी लढत आहे. 2007 पासून मी आवाज उठवत आहे. मात्र, आपलेच पुढारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले.