रायगड -छत्रपती शिवाजीमहाराज यांची तिथीनुसार जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्ताने कुलाबा क्रीडा प्रबोधिनी अलिबागतर्फे किल्ले रायगड ते अलिबाग छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यापर्यंत 125 किमी अंतर बारा तासात शिवज्योत घेऊन धावत 50 शिवभक्तांनी पूर्ण केले आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांचे विचार मुलांना प्रेरित करावे या उद्देशाने कुलाबा क्रीडा प्रबोधिनीतर्फे जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवत असल्याचे यतीराज पाटील यांनी सांगितले.
कोरोनामुळे किल्ले रायगडावरून आणली शिवज्योत
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे पुढील पिढीला ज्ञात व्हावे, त्यांचा इतिहास कळावा यासाठी कुलाबा क्रीडा प्रबोधिनी अलिबागतर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार येणारी शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. यावर्षी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत आणली जाणार होती. मात्र कोरोना महमारीने पुन्हा डोके वर काढले असून पुणे जिल्ह्यात संचारबंदी असल्याने किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यात आली.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व सहभागी
30 मार्च रोजी किल्ले रायगडावर राज सदरेवरून रात्री साडेदहा वाजता छत्रपती शिवाजीमहाराज यांना वंदन करून शिवज्योत पेटवून उपक्रमास सुरुवात केली. मुंबई-गोवा महामार्गावरून रोहा, चणेरा, रेवदंडा मार्गे अलिबागेत 31 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती दिवशी शिवज्योत दाखल झाली. अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर शिवज्योत ठेवण्यात आली. त्यानंतर आरती करून कुलाबा क्रीडा प्रबोधिनीच्या मावळ्यांनी महाराजांना वंदन करून उपक्रमाची सांगता केली. यावेळी अलिबाग नागरपरिषदेचे नगराध्यक्षही उपस्थित होते. लहान मावळ्यांपासून ते मोठ्यापर्यंत या उपक्रमात सर्व सहभागी झाले होते.