रायगड- निसर्ग चक्रीवादळानंतर मदतीच्या बहाण्याने येऊन अलिबाग तहसीलदार यांचा विश्वास संपादन करून आरोग्यवर्दीनी योजनेच्या नावाखाली व्यापाऱ्यांना 18 लाखाचा गंडा घातला होता. याप्रकरणी ऑल इंडिया रिहाबिलिटीशन फोरम या कथित संस्थेचा अध्यक्ष डॉ साजिद सय्यद याला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.
अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी डॉ साजिद सय्यद याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी साजिद सय्यद याला अलिबाग न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकारामुळे अलिबाग महसूल विभागाची लक्तरे ही वेशीवर टांगली आहेत.
3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर अनेक सामाजिक संस्थांनी ग्रास्थांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. आरोपी डॉ. साजिद सय्यद याने लंडन येथून पीएचडी करून आलो असून माझी ऑल इंडिया रिहाबलिटीशन फोरम संस्था आहे. संस्थेच्या मार्फत मी गरजूंना मदत करतो असे अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन सांगितले होते. त्यानुसार सय्यद यानी काही नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोवजचे वाटप केले. खानाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वेलटवाडीवरील आदिवासी बांधवांना हायटेक घरे बांधून देतो असे सांगून प्रकल्प आराखडाही बनवला. सय्यद याच्या या भूलथापांना महसूल अधिकारी बळी पडले.
अलिबाग तहसील कार्यालयात आरोग्यवर्दीनी प्रकल्पाच्या माध्यमातून कोविड 19 च्या रुग्णांना मोफत उपचार, औषध, तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष, मोबाईल अॅप विकसित करून देतो असे सांगून आरोपी सय्यद याने काम सुरू केले. सय्यद याने अलिबाग तहसीलदार यांच्या ओळखीचा फायदा घेऊन खोटे लेटर पॅड बनवून शहरातील फार्मसिटीकल डीलर, फर्निचर डीलर यांच्याकडून उधारीवर साहित्य मागवले. तसेच खोट्या लेटर पॅडवर डॉक्टरांची नियुक्तीही केली. डीलर आणि डॉक्टरांना पैसे काही दिवसात देण्याची मुदतही मागवून घेतली.
आरोपी सय्यद याच्या या कृतीबाबत तहसीलदार सचिन शेजाळ यांना संशय आला म्हणून त्यांनी संस्थेची माहिती ऑनलाइनद्वारे घेतली. त्यावेळी आरोपी हा फसवणुकीत मास्टर असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर शेजाळ यांनी 11 सप्टेंबर रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात डॉ साजिद सय्यद याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी सय्यद यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केला. आरोपीस 12 सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन अलिबाग येथे चौथे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पी. एस.जी. चाळकर यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. तोडकरी हे पुढील तपास करीत आहेत.
आरोपी अट्टल गुन्हेगार