रायगड - रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून तिला जीवे मारण्याची घटना 26 जुलै रोजी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी बारा तासात एका आरोपीला अटक केली होती. या अत्याचार आणि खून प्रकरणात अजून पाच सज्ञान तर एक अल्पवयीन आरोपी, अशा एकूण सहा जणांना आज (शुक्रवार) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यामुळे या खून प्रकरणात आतापर्यंत एकूण सात आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
रोहा तालुक्यातील तांबडी गावातील एक अल्पवयीन मुलगी ही आपल्या आजोबांना 26 जुलैच्या सायंकाळी ताम्हणशेत येथे शेतावर आणण्यास गेली होती. त्यावेळी आरोपींनी तिला ताम्हणशेत बुद्रुक परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि ठार मारले. या घटनेनंतर पोलिसांनी बारा तासाच्या आत एका आरोपीला ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने एक अल्पवयीन आणि पाच सज्ञान मुलांचा सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे पथकाने त्या आरोपींना ताब्यात घेतले. या सहा जणांनी आपण हा गुन्हा केला असल्याचे कबूली दिली आहे.