खालापूर (रायगड) - तालुक्यातील महड येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थाना शिक्षणाचे धडे गिरवता यावेत म्हणून डिजिटल शाळा करण्यात आली होती. याठिकाणी डिजिटल साहित्य व पोषण आहारासाठी असणारी भांडी व अन्य साहित्याची चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून येथील सर्व सामान चोरून नेल्याचे समोर आल्याने येथील शिक्षकांंनी याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर या प्रकरणाचा वेगवान तपास करत पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. या दोघांनाही तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शाळेतील डिजिटल साहित्यासह इतर साहित्याची चोरी -
महड येथे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थांना शिकविण्यासाठी प्रोजेक्टर, सीपीयु, मॉनिटर आणि प्रिंटर हे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थांना पोषण आहार देण्यासाठी ताटे (19), बादल्या (1), ग्लास (45), टाकी, पातेले आदी. साहित्य ही शाळेच्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे शिक्षक अधूनमधून येत असतात. नुकताच दोन दिवसांपूर्वी चक्रीवादळ आल्याने शाळेचे काही नुकसान झाले की नाही यांच्या पाहणीसाठी येथील मुख्याध्यापिका अनिता चव्हाण व सहशिक्षिका जयश्री सुर्वे या शाळेत आल्या असता शाळेचा कडीकोंडा तोडलेल्या अवस्थेत दिसून आला. आत प्रवेश करून पाहिले असता डिजिटल शाळेचे साहित्यासह पोषण आहाराची भांडीही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर याबाबत मुख्याध्यापिका अनिता चव्हाण यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.