रायगड - जिल्ह्याच्या टोकाला असलेला महाड विधानसभा मतदारसंघ हा तसा विरोधी विचारसरणीचा मतदारसंघ आहे. क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहीत, दलित मित्र सुरभानाना टिपणीस, लोकनेते शांतारामभाऊ फिलसे यांच्यासारख्या मातब्बरांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. भौगोलिकदृष्ट्या दुर्गम अशा या मतदारसंघात महाड आणि पोलादपूर तालुक्यांसह माणगाव तालुक्यातील दोन जिल्हा परीषद गटांचा समावेश आहे. २००४ च्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या माणिकराव जगताप यांचा अपवाद वगळता महाड विधानसभा मतदारसंघातून नेहमी काँग्रेस विरोधी विचारसरणीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
महाड विधानसभा आढावा: पुन्हा रंगणार गोगावले विरुद्ध जगताप सामना - रायगड
महाड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्यानंतर माणिकराव जगताप यांना मानणारा म्हणजे काँग्रेस विचारसरणीच्या मतदारांचा नंबर लागतो. भाजपा, शेकाप व इतर राजकिय पक्षांची या मतदारसंघातील ताकद कमी असली तरी प्रविण दरेकर, जयवंत दळवी, बिपीन म्हामुणकर यांसारखे मुत्सद्दी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची ताकद निर्णायक ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत आघाडीने युतीला याठिकाणी फक्त सात हजारांची आघाडी दिली होती. 2014 मध्ये याच मतदारसंघातून गीतेंना 16 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भरत गोगावलेंना माणिक जगताप टक्कर देऊ शकतात. मात्र, गोगावले यांचा गावागावात असलेला जनसंपर्क हा त्यांची जमेची बाजू आहे.
महाड विधानसभा मतदारसंघात नागरी समस्या कमी नाहीत. बेरोजगारी, शाळा आणि रस्त्यांची दुरवस्था, पाणीप्रश्न, आरोग्य आणि प्रदुषण या सर्वच समस्या या मतदारसंघ आहेत. येथील राजकारण हे नागरी समस्यांऐवजी भावनीक मुद्दयांवर चालत आले आहे. आता पुन्हा शिवसेनेचे भरत गोगावले आणि काँग्रेसचे माणिकराव जगताप यांनी आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी दंड थोपटले आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या कलगीतुरऱ्यात महाडचा आमदार कोण होणार, हे आता मतदारराजाच ठरवेल.