खालापूर (रायगड) - गेल्या काही वर्षापासून कर्जत तालुक्यातील नेरळ वरई येथे एक्सबेरिया कंपनीकडून गृहप्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून या गृह प्रकल्पात अनेकांनी आपल्या स्वप्नातील घर खरेदीसाठी आयुष्याची पदरमोड केली आहे, परंतु अद्याप या कंपनीकडून घराचा ताबा देण्यात येत नसून ग्राहकांचे पैसे देखील परत केले जात नसल्याचा आरोप येथील खरेदीदारांनी केलाय. याबाबत मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याकडून पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांना एक पत्रक देण्यात आले आहे. या पत्रकात पाटील यांनीं एक्सबेरिया गृहप्रकल्प विकासकावर फसवणूक केल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी केली असून कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल असे देखील म्हटले आहे.
यापूर्वी फसवणूक केल्याप्रकरणी पुन्हा एकदा एक्सबेरिया कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या अगोदर देखील कंपनीवर शेतकऱ्यांच्या शेत जमिनी बलकावण्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तर येथील कंपनीच्या मनमानी कारभारामुळे गावातील शेतकऱ्यांचे देखील शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे मीडियासमोर आले होते. अशा एक ना अनेक प्रकरणात चर्चेचा विषय ठरलेल्या या कंपनी विरोधात आता मनसे देखील रस्त्यावर उतरलेली दिसत आहे.