रायगड - महाड शहरातील तारीक गार्डन इमारत दुर्घटना अजून ताजी असतानाच तालुक्यातील बिरवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक अशी इमारत समोर आली आहे. हबीबा कॉप्लेक्ल नावाची ही इमारत धोकादायक झाली आहे. तारिक गार्डन इमारत दुर्घटनेसारखी घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलली आहेत. महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांनी बिल्डरला नोटीस काढली आहे. तर इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या तंत्र तज्ज्ञांकडून करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
बिरवाडीमधील हबीबा कॉम्प्लेक्स इमारत धोकादायक
महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण सुखरूप बचावले होते. त्यानंतर महाड शहरातील जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र महाड तालुक्यातील अन्य भागातही जुन्या इमारती ह्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील बिरवाडी येथील हबीबा कॉम्प्लेक्स ही इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीच्या तळ मजल्याच्या आरसीसी पिलर्सना तडे गेले आहेत. आतील लोखंडी सळ्या गंजून बाहेर आल्या आहेत. इमारतीचा स्लॅबदेखील अनेक ठिकाणी तडकला असून भिंतींनादेखील तडे गेले आहेत. असे असूनही या फ्लॅटधारक आणि गाळे धारक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.