रायगड -जिल्ह्यातील रोहा येथे दुर्मीळ उडता सोनसर्प आढळून आला आहे. जिल्ह्यात प्रथमतःच आढळून आलेल्या या सापामुळे सर्पमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या सापाबाबत अधिक अभ्यास करून, अशा दुर्मीळ सापांना संरक्षण देण्यात यावे, अशी सर्पमित्रांनी यावेळी मागणी केली आहे.
सर्पमित्रांमध्ये व्यक्त केला जातोय आनंद -
रोहा तालुक्यातील डोंगरी येथे राहणाऱ्या अमोल देशमुख यांच्या घराजवळ असलेल्या शेडमध्ये साप दिसून आल्याने त्यांनी सर्पमित्रांना बोलावले होते. यावेळी रोहा येथील सर्पमित्रांना परिसरात आढळणाऱ्या प्रजाती व्यतिरिक्त नवीन प्रजातीचा साप असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी या सापाची सुटका करून सहकारी मित्रांकडून अधिक माहिती घेतली असता तो उडता सोनसर्प असल्याचे निदर्शनास आले. या सापाला इंग्रजीत ऑरनेट फ्लाईंग स्नेक असे म्हणतात. हा साप महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर आणि आंबोली घाटात काही प्रमाणात आढळून येतो. मात्र, हा साप या ठिकाणी कसा आला याबाबत सर्पमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. उडता सोनसर्प आपल्या विभागात मिळाल्याने सर्पमित्रांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.