रायगड- निवडणुका आल्या की मतदार हा उमेदवारासाठी राजा होतो. मात्र, निवडणूक झाली की मतदार हा राजा न राहता प्रजा होते व उमेदवार त्यांना विसरून जातो. मात्र अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राजाभाऊ उर्फ राजेंद्र मधुकर ठाकूर यांनी खानाव येथील त्यांच्या समर्थनार्थ झालेल्या प्रचंड सभेमध्ये चक्क श्रोत्यांमधील एका मतदारालाच व्यासपिठावर बोलविले. व त्या मतदाराचा सत्कार करून सर्व मतदारांचा प्रतिनिधीक सत्कार केला. राजाभाऊ ठाकूर यांच्या या कृतीने सर्व सभाच अवाक झाली.
आजपर्यंत फक्त सभेला येवून नेत्यांची भाषणे ऐकायची व त्यानंतर मतदानाबद्दल निर्णय घ्यायचा, अशी मतदारांची धारणा होती. परंतु राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी सभेच्या सुरूवातीलाच मतदारांचा प्रातिनीधीक सत्कार करण्यासाठी उपस्थित गर्दीपैकी एकाचा सत्कार करण्याची अनोखी पध्दत रूढ केली. त्यामुळे सोशल मीडियामधून व जनतेमधून त्यांचे कौतूक होत आहे.