महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान मोदी हिटलरच्या चालीवर; राज ठाकरेंचा महाडमध्ये घणाघात

राज महाराष्ट्रभर घेत असलेल्या सभांमध्ये मोदींच्या भाषणांचे जुने व्हिडिओ दाखवत आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून ते मोदींनी ५ वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने आणि आताची प्रत्यक्ष परिस्थिती मतदारांना दाखवून देत आहेत. त्यांची ही पद्धत सध्या राज्यातच नाही, तर देशभरात चर्चिली जात आहे. नांदेड, सोलापूर, सातारा, पुण्यानंतर आज त्यांनी कोकणातल्या महाडमध्ये सभा घेतली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

By

Published : Apr 19, 2019, 9:07 PM IST

Updated : Apr 19, 2019, 11:01 PM IST

रायगड - लोकसभेच्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यभर सभा घेऊन आपल्या भाषणातून मोदी-शाह यांच्यावर तुटून पडत आहेत. आज त्यांची महाड येथे चांदे मैदानावर सभा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी हे हिटरच्या चालीवर चालत असल्याचा घणाघात राज यांनी आपल्या भाषणातून केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा

पंतप्रधान मोदी यांना स्वतः दत्तक घेतलेल्या गावाचा विकास ५ वर्षात करता आला नाही, ते तुमचा काय विकास करणार? असा उपरोधिक टोला राज यांनी मोदींना लगावला. महाड येथील आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, जितेंद्र पाटील, वैभव खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात तिखट शब्दात टीका केली. यावेळी 'लावरे' बोलून मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढणारे व्हिडिओही जनतेसमोर दाखवले.

राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षात असे कोणते काम केले की ते तुमच्यापुढे सांगू. मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील नागेपूर हे दत्तक घेतलेले गावही ५ वर्षात सुधारित केले नाही. यावेळी या गावातील सद्य परिस्थिती बाबत व्हिडिओ जनतेसमोर दाखविण्यात आला. मोदी यांनी काँग्रेस पक्षाने केलेल्या योजनांची नावे बदलून त्याच योजना जनतेपुढे सादर केल्या. देशात कॅशलेस पद्धत सुरू केली. मात्र, देशात पहिले कॅशलेस झालेले गावही फक्त नावालाच कॅशलेस झाले आहे, असे राज ठाकरे म्हणाले. नोटबंदी करून देशाला आर्थिक संकटात मोदींनी टाकले आहे.

भाजपकडे निवडणूक काळात पैसे आले कुठून असा सवालही यावेळी राज यांनी विचारला. त्यामुळे नरेंद्र मोदी व अमित शाह यांना पुन्हा सत्तेत आणून नवसंजीवनी देऊ नका. तसेच त्यांना मदत करणाऱ्या पक्षालाही मदत करू, नका असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे.

कोकणात निसर्गाने भरभरून दिले आहे. मात्र, याठिकाणी पर्यटनाला चांगली चालना मिळत नाही. दुसरीकडे केरळ राज्य हे कोकणासारखेच असून आज ते पर्यटनात एक नंबरवर आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्याला पर्यटनावर चांगले लक्ष दिले. तर, हे तीन जिल्हे राज्याला आर्थिक सुबत्ता मिळवून देऊ शकतात. मात्र, येथील सत्ताधाऱ्यांना ते करता आलेले नाही, असा टोलाही सत्ताधारी पक्षाला राज ठाकरे यांनी मारला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी राज यांचे भाषण ऐकण्यास गर्दी केली होती.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

  • देशात लोकशाही राहाणार, की हुकूमशाही येणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे.
  • मोदी आणि शाह हे यापुढे सरकारमध्ये दिसता कामा नये. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे.
  • मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल राज यांनी यावेळी केली. त्यासोबत ते म्हणाले, मोदींनी दत्तक घेतलेले गाव सुधारले नाही, तर तुमचे काय होणार.
  • विदर्भातील हरिसाल या डिजिटल व्हिलेजचा मोदी सरकारने कसा बोजवारा उडवला आहे, हे मागील काही सभांमधून सांगितल्यानंतर मोदींच्या नोटाबंदी आणि कॅशलेस इंडियाचा राज यांनी महाडमधील सभेत समाचार घेतला.
  • मुरबाडमधील धसई गाव हे मोदींनी जाहीर केलेले पहिले कॅशलेस गाव होते. त्याचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी कॅशलेस इंडिया फेल झाल्याचे सांगितले.
  • अमोल यादव या भारतीय तरुणाने स्वदेशी बनावटीचे विमान तयार केले. मेक इन इंडियामध्ये त्याचे सादरीकरण केले. त्याला मोदी-फडणवीस सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र, गेल्या तीन वर्षात अमोल यादवचे स्वदेशी बनावटीचे विमान तयार करण्यासाठी कोणतीही मदत मेक इन इंडियामार्फत मिळाली नसल्याचा आरोप राज यांनी केला. या सरकारला वैतागून अमोल यादव त्याचा प्रकल्प अमेरिकेत घेऊन जाणार असल्याचे वृत्त असल्याचेही राज यांनी सांगितले.
Last Updated : Apr 19, 2019, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details