रायगड - जिल्हा परिषदेच्या ‘रायगड भुषण’ या पुरस्कारबाबत सत्ताधारी व प्रशासनानी कमालीची गुप्तता पाळली आहे. जिल्ह्यात किती जणांना पुरस्कार दिले जाणार? याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रशासनाला विचारले असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. शनिवारी या पुरस्कारांचे वितरण रोहा येथे करण्यात येणार आहे. २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर२०१७-१८ व २०१८-१९ चे रायगड भुषण पुरस्कार वितरण सोहळा होत आहेत. रायगड भुषण पुरस्काराची खिरापत वाटली जात असल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही परत एकदा सुमार दिडशे पेक्षा जास्त जणांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे समजते आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तीमत्वाला रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड भुषण पुरस्कार देवून गौरवण्यात येते. मात्र, ही यादी शंभरवर जावून पोहोचल्याने नागरीकांमधून नाराजीचा सुर उमटायला लागला होता.या कारणास्तव २ वर्ष हे पुरस्कार देण्याचे टाळले होते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील १ ते २ व्यक्तींना पुरस्कार प्राप्त होतील व पुरस्काराची संख्याही कमी असेल असे वाटले होते. मात्र, यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही.
जिल्हा परिषदेला तरुण आणि नव्या दमाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळाल्यानंतर यात बदल होईल असे वाटले होते. त्यातच गेली २ वर्ष हा पुरस्कारच दिला गेला नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदापुरस्काराची खैरात वाटली जाणार असल्याचे समजते.