महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडातील लोकसभा प्रचाराच्‍या तोफा थंडावल्‍या; अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरेंमध्ये मुख्‍य लढत

लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्‍या तोफा आज थंडावल्‍या आहेत. मागील २० दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपली आहे. येथील मुख्य लढत ही शिवसेनेचे अंनत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांच्यात रंगणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाचे मुख्य उमेदवार अंनत गिते आणि सुनिल तटकरे

By

Published : Apr 21, 2019, 11:10 PM IST

रायगड - लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्‍या तोफा आज थंडावल्‍या आहेत. मागील २० दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपली असून यावेळी रायगड लोकसभेसाठी १६ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्‍य लढत शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्‍यात होणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाचे मुख्य उमेदवार अंनत गिते आणि सुनिल तटकरे

विद्यमान खासदार अनंत गीतेंना पुन्‍हा निवडून आणण्‍यासाठी शिवसेना, भाजपने कंबर कसली आहे तर सुनील तटकरेंच्‍या विजयासाठी आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्‍यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेस आणि शेकापचे कार्यकर्तेही प्रचार करताना दिसून आले.

वंचित बहुजन आघाडीच्‍या सुमन कोळी, बसपाचे मिलिंद साळवी हे देखील निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत. अनंत गीते यांच्‍यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते आदेश बांदेकर, नीलम गोऱ्हे यांनी सभा घेतल्‍या तर सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार, अमोल कोल्‍हे, विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडेंनी हजेरी लावली होती. तर वंचित बहुजन आघाडीच्‍या सुमन कोळींसाठी प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतली होती. 2014 मध्‍ये झालेल्‍या तिरंगी लढतीत शिवसेनेचे अनंत गीते यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरेंवर २१०० मतांनी निसटता विजय मिळवला होता.

यावेळच्‍या प्रचारातही नेहमीप्रमाणे आरोप प्रत्‍यारोपांच्‍या जोरदार फैरी झडल्‍या. थेट प्रचार संपल्‍यानंतर आता उमेदवार आणि त्‍यांच्‍या समर्थकांनी प्रत्‍यक्ष मतदारांच्‍या गाठीभेटीवर भर दिला आहे. त्‍यामुळे सोमवारचा दिवस हा छुप्‍या प्रचाराचा असणार आहे. या मतदारसंघात २ हजार १७९ मतदान केंद्रे असून १६ लाख ५१ हजार ५६० मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात पुरुष मतदार ८ लाख ९ हजार ३४४ आणि महिला मतदार ८ लाख ४२ हजार २१३ आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details