रायगड - जिल्हा परिषदेच्या 4 विषय समिती सभापती पदाची निवडणूक परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात पार पडली. विषय समिती सभापती निवडणूक ही बिनविरोध पार पडली. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 सभापती पदे मिळाली.
रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध
जिल्हा परिषदेच्या 4 विषय समिती सभापती पदाची निवडणूक परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात पार पडली. विषय समिती सभापती निवडणूक ही बिनविरोध पार पडली. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 सभापती पदे मिळाली.
शेकापचे दिलीप भोईर यांची समाजकल्याण, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता जाधव यांची महिला बालकल्याण सभापतीपदी तर अन्य 2 विषय समिती सभापतीपदी शेकापच्या अॅड. नीलिमा पाटील आणि राष्ट्रवादीचे बबन मनवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी जाहीर केले. सभापती निवडीच्या वेळी शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी अनुपस्थिती दर्शवली. जिल्हा परिषदेतील महत्वाचे अर्थ आणि बांधकाम सभापती पदासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
विषय समिती सभापती पदाच्या आजच्या निवडीकडे शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी पाठ फिरवल्याने चारही सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. अर्थ आणि बांधकाम सभापती पदासाठी शेकापच्या अॅड निलिमा पाटील या इच्छुक आहेत. मात्र, हे सभापतीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने याबाबत दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे अर्थ व बांधकाम सभापती पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे लक्ष लागले आहे.