रायगड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात सर्व वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. अशा स्थितीत निवृत्ती वेतन घेण्यास जाणाऱ्या वयोवृद्ध निवृत्तीधारकांची चांगलीच पंचायत झाली. तेव्हा निवृत्ती वेतन धारकांची ही अडचण ओळखून जिल्हा डाक कार्यालयाने जिल्ह्यातील या निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे निवृत्ती वेतन घरपोच देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी जिल्ह्यातील 141 निवृत्तधारकांना 25 लाख 11 हजार सहाशे रुपयांचे निवृत्ती वेतन प्रत्येकाच्या घरी जाऊन दिले. याबाबत निवृत्ती धारकांनी डाक कार्यालय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
निवृत्ती धारकाला निवृत्ती वेतन देताना डाक कर्मचारी... एकीकडे खासगी बँका या मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना पोस्ट कार्यालयाचेही बँकेत रूपांतर झाले आहे. आजही लाखो ग्राहक यांचा पोस्टावर विश्वास आहे. हाच विश्वास पोस्टाने अजून द्विगणित केला आहे. कोरोनाच्या संकटा काळात देशात संचारबंदी लागू केली गेली आहे. त्यामुळे कामधंदा, व्यवहार, सर्व शासकीय, खाजगी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त खाजगी वाहतूकही बंद केली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातून निवृत्त झालेल्या जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध पेन्शन धारकांसमोर बाका प्रसंग उद्भवला होता.
जिल्ह्यातील 583 निवृत्तीधारकांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या डाक कार्यालयात आपले खाते काढलेली आहेत. या खात्यात निवृत्ती वेतन दर महिन्याला जमा होते. कोरोनामुळे वाहतूक सेवा बंद झाल्याने जमा झालेले निवृत्ती वेतन काढायचे कसा? असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला होता. मात्र हा प्रश्न रायगड डाक कार्यालयाचे अधीक्षक उमेश जनवाडे यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने सोडवला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणच्या 141 निवृत्ती धारकांना पोस्ट मास्तर, पोस्टमन यांनी घरी जाऊन त्याचे पैसे त्याच्या हातात सुपूर्द केले. तर इतर राहिलेल्या निवृत्ती धारकानांही लवकरच त्याचे निवृत्ती वेतन घरपोच दिले जाणार असल्याचे जनवाडे यांनी सांगितले.
जिल्हा डाक कार्यालयाचे 'कोरोना योद्धा' निवृत्ती धारकासाठी ठरले 'देवदूत' डाक, टेलिकॉम, रेल्वे या शासकीय कार्यालयातून निवृत्त झालेल्या निवृत्ती धारकांना त्यांचे निवृत्ती वेतन घरपोच पोहचवले. यात वयाने ९० पार केलेले आजी-आजोबा यांचा समावेश होता. त्यांनी घरपोच वेतन मिळाल्याने दिलेले आशीर्वाद हे आम्हाला लाख मोलाचे असल्याची भावना अलिबाग कार्यालयाच्या पोस्ट मास्तर अनुराधा पेणकर यांनी व्यक्त केल्या. परेश राऊत, किशोर मढवी, मधुकर पाटील, मीना म्हात्रे, गंगाराम पाटील, महेंद्र हुमणे, किशोर नाखवा, सुग्रीव टोगरे, इस्माईल हमदुले, गणपत ढोले आणि योगेश मते या डाक कार्यालयाच्या कोरोना योध्यानीं ही कामगिरी पार पाडली आहे. हेही वाचा -सायबांचा वाढदिवस अन् सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रंगली मटणाची पार्टी; अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह नेत्यांची हजेरी
हेही वाचा -कार्यालयातच मटण पार्टी करणे गटविकास अधिकाऱ्याला पडले महाग, झाली निलंबनाची कारवाई