रायगड -कोरोना विषाणू या शत्रूला युद्धात हरवीण्यासाठी सर्वात महत्वाची गरज आहे ती म्हणजे जनतेच्या सहकार्याची. जनता जर घरातून बाहेरच पडली नाही तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होणार नाही. यासाठी शासन आणि प्रशासन वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे. रायगड पोलिसांनी तर एक पाऊल पुढे जाऊन पौराणिक, सिनेमा, कार्टूनचा आधार घेऊन उनाडटप्पूना बाहेर पडू नका, असे संदेश देणारे माहिती फलक बनवून नागरिकांना आवाहन केले आहे. रायगड पोलिसांनी बनविलेले हे पोस्टर संदेश सध्या सोशल मीडियावर चर्चेचे ठरले आहेत.
रायगड पोलिसांसोबत तानाजी, कुंभकर्ण अन् सुपरहिरो; जनतेने घरी थांबण्यासाठी नामी शक्कल - रायगड पोलीस कोरोना रुग्ण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या युक्त्या, कल्पना करीत आहे. पोलीसही नवीन नवीन हातखंडे वापरून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करीत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या युक्त्या, कल्पना करीत आहे. पोलीसही नवीन नवीन हातखंडे वापरून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र तरीही नागरिक हे बाहेर पडत आहेत. जिल्हा पोलिसांनी यावर आता नामी युक्ती केली असून रामायण मालिकेतील कुंभकर्ण, तानाजी सिनेमातील तानाजी तर कार्टून हिरोचा आधार घेतला आहे.
कोरोनाचा भस्मासूर वाटेत उभा असतानादेखील काहीजण लॉक डाऊनचे नियम पायदळी तुडवून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अशा बेफिकीरांचा रस्ता अडवण्यासाठी रायगड पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. यात तान्हाजी चित्रपट व रामायण मालिकेचा आधार घेतला आहे. पोलिसांनी पोस्टर प्रसिद्ध करत त्यावर हटके डायलॉग दिले आहेत. तलवार नाही तर तुम्हाला मास्कची गरज आहे, असे सांगणारे नरवीर तानाजी तर माजसारखे घरात झोपा असा सांगणारा कुंभकर्ण दाखवण्यात आला आहे. जो नियमांचे पालन करेल तोच खरा सुपरहिरो असे कार्टून्सद्वारे दाखविण्यात आले आहे. या अनोख्या आयडियाचे कौतुक तर होत आहेच शिवाय त्याची नागरिकांकडून दखलही घेतली जात असल्याने 'उनाडटप्पूंना, घरात जेरबंद करण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.