रायगड -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले हद्दीत असलेल्या फार्महाऊसबाबत संशयितपणे चौकशी करणाऱ्या तिघांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांची रायगड पोलीस सध्या कसून चौकशी करीत आहेत. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ उपस्थित आहेत. यानंतर ठाकरे फार्महाऊसवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
खालापूर तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 'ठाकरे' फार्महाऊस आहे. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठाकरे फार्महाऊसवरील सुरक्षा रक्षक हे गस्त घालत होते. ते भिलवले डॅमवरील ब्रिजवर आले असता तेथे उभ्या असलेल्या एका गाडीमधील तीन व्यक्तींनी सुरक्षा रक्षकांना ठाकरे फार्महाऊस कोठे आहे, असे विचारले. सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी मला माहीत नाही, असे उत्तर दिले.
उद्वव ठाकरे यांच्या फार्महाऊस चौकशी करणारे तिघे रायगड पोलिसांच्या ताब्यात त्यानंतर काही वेळाने तीनही व्यक्ती हे ठाकरे फार्महाऊसजवळ येऊन गेटमध्ये घुसून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करून तेथून निघून गेले. सुरक्षा रक्षकाने तातडीने खालापूर पोलिसांना याबाबत कळवले व गाडीचा क्रमांक दिला. खालापूर पोलिसांनी तातडीने गाडीचा शोध घेऊन तीन संशयितांना ताब्यात घेतले. खालापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी दाऊद गँगकडून मातोश्री बंगल्यावर फोन आले होते. त्या अनुषंगाने आरोपींनी रायगडमधील ठाकरे फार्हाऊसबाबत चौकशी सुरू केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.