रायगड -खोपोली ते पेण या रस्त्यावर गागोदे फाटा येथे गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 20 जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावरची अवजड वाहतूक काही काळ बंद करण्यात आली.
पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात, 1 ठार 20 जण जखमी रविवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गागोदे फाटा येथे गॅस वाहून नेणाऱ्या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात बसमधील एक जण जागीच ठार झाला असून तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींवर पेणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एसटी बस चालक एम. जी. गुलघे यांनी दिलेल्या माहिती नुसार, खोपोलीहून पेणकडे जात असताना समोरून येणारा गॅसवाहक टँकर अनियंत्रित झाला. तो थेट एस. टी. बसला धडकून पुढे रस्त्यावर कलंडला. यात एस टी बसचा उजव्या बाजूचा पत्रा कापला गेला आणि बस रस्त्याच्या बाजूला कलंडली.
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना बसच्या बाहेर काढून रुग्णालयात हलवले. अपघातानंतर या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक आमदार धैर्यशील पाटील यांनीही तातडीने अपघाताच्या ठिकाणी पोहोचून जखमींना मदत केली.