महाड (रायगड) :महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे १५० जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. रेस्क्यू स्कॉड आणि प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
रायगड इमारत दुर्घटना : भूकंप झाला समजून बाहेर आल्यामुळे वाचला जीव - प्रत्यक्षदर्शी मुलाने सांगितले भूकंप झाला...
इमारत कोसळण्याच्या सुमारास मी घराबाहेर होतो. घरी असलेल्या माझ्या मुलाने मला फोन करून सांगितले, की भूकंप होतो आहे. मी त्याला भूकंप होत नसल्याचे सांगत होतो. तरीही आपल्या बोलण्यावर कायम राहत तो आपल्या आईला सोबत घेत इमारतीबाहेर आला. त्यानंतर केवळ काही क्षणांमध्येच संपूर्ण इमारत कोसळली, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.
बिल्डरने एका वर्षात बांधली इमारत..
इमारत बांधणाऱ्या बिल्डरने केवळ एका वर्षात ही इमारत उभी केली आहे. यासाठी वापरण्यात आलेले साहित्य हलक्या प्रतीचे असून इमारतीचे कामही तकलादू केल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असे आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
यानंतर या बिल्डरवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच त्याच्याकडून प्रत्येक कुटुंबासाठी नुकसानभरपाई वसूल करावी अशी मागणी या इमारतीत राहणारे लोक करत आहेत.
दरम्यान, दुर्घटना झालेल्या इमारतीत ४७ कुटुंबे राहत होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही साधारण 150 जण अडकले आहेत. स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू स्कॉडच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. आतापर्यत आठ ते दहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच श्वानपथकही बोलविण्यात आले आहे. इमारतीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू झाले आहे अशी माहिती आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली आहे.