रायगड - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदान पार पडले असून आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. 23 मे रोजी मतमोजणी नंतर रायगडकरांनी कोणाला कौल दिला हे कळणार आहे. मात्र, आतापासूनच दोन्हीकडील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमचाच उमेदवार येणार याबाबत ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात लढत झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गीते यांनी तटकरे यांचा अवघ्या २१०० मताने पराभव केला होता. यावेळी तटकरे याना काँग्रेस पक्षाबरोबर शेकापची साथ मिळालेली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाड येथे सभा घेतल्याने त्याचा फायदा तटकरे याना मिळू शकतो त्यामुळे त्यांनी आपला विजय निश्चित मानला आहे.
शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते हे ६ वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. तर ७ व्या वेळी पुन्हा खासदार म्हणून निवडून जाणार, असा विश्वास त्यांनी आधीच बोलून दाखवला आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप हे ३ पक्ष एकत्र आल्याने याचा फटका गीते याना बसू शकतो असे चित्र आहे.