रायगड : इर्शाळवाडीत भूस्खलन झाल्याने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडीत एनडीआरएफने बचाव कार्य सुरू केले आहे. बचाव आणि मदतकार्यसाठी एनडीआरएफची चार पथके दाखल झाली आहेत. बुधवारी रात्री इर्शाळवाडीत भूस्खलनाची घटना घडली होती. घटनास्थळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 जुलै रोजी पोहोचले आणि त्यांनी रायगड जिल्ह्यातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. दरम्यान गुरुवारी रात्री अंधार आणि पावासामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले असून राडोराडा बाजुला हटवण्याचे काम केले जात आहे.
ढिगारा उपसण्याचे काम सुरू :काल पहाटेपासून रात्रीपर्यंत मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. परंतु अंधार आणि पावसामुळे हे काम थांबवण्यात आले होते. साधरण 15 ते 20 फूट मातीचा मलबा साचला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवानांसोबत स्थानिक नागरिकही मातीचा ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. इर्शाळवाडीत जाण्यासाठी एकही पक्का रस्ता नाही. मलबा बाजुला करण्याचे काम करण्यासाठी मोठे उपकरणे एनडीआरएफ आणि अग्निशमक दलाला नेता आले नाही. ढिगारा उपसा करण्यासाठी कुदळ फावड्याने माती उपसली जात आहे. दरम्यान आज सकाळपासूनच इर्शाळवाडीत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, आता या पावसातच ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांचा शोध घ्यावा लागणार आहे.