रायगड: खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायत हद्दीतील इर्शाळवाडी दरडी खाली गाडले गेले. हे ठिकाण ट्रेकर्ससाठी खूप महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे होते. येथील स्थानिक ट्रेकर्स आणि पर्यटकांना आपलेसे बनवत असायचे. जीवाला जीव देणारी माणसे असलेली ही वाडी एका दिवसात दिसेनाशी झाली. इर्शाळवाडीवर आलेल्या या संकटाच्या जखमी कधीच भरुन निघाणाऱ्या नाहीत.
जिव्हाळ्याची ट्रेक :ट्रेकिंगला जाणाऱ्या लोकांची राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था इर्शाळवाडीतील ग्रामस्थ करीत होते. त्यामुळे ट्रेकर आणि ग्रामस्थ यांच्यात जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जमले होते. दरड दुर्घटनेमुळे आता हा ऋणानुबंध कायमचा मिटणार की काय? असे दुःख साई सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी व्यक्त केले. पेणसह रायगड जिल्ह्यातील असंख्य गडांची काळजी घेणाऱ्या समीर म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत तीनवेळा इर्शाळगडावर चढाई केली आहे. यावेळी इर्शाळवाडीत त्यांचे रात्रीचे वास्तव्य करत असायचे. तेथील आदिवासी समाजातील बांधव हे गरज लागल्यास प्रेमाने त्यांची राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था करत असत.
काय म्हणाले समीर म्हात्रे :समीर म्हात्रे हे इर्शाळवाडीच्या ट्रेकला गेले होते. त्यावेळी त्यांना आलेल्या अनुभवाविषयी त्यांनी सांगितले आहेत. समीर म्हात्रे आतापर्यंत तीनवेळा इर्शाळवाडीच्या ट्रेकला गेले आहेत. म्हात्रे म्हणतात, काहीवेळा रात्री अपरात्री कधीही गेलो तरी ग्रामस्थ रात्री जेवण आणि सकाळी चहा-नाश्ताची सुविधा उपलब्ध करुन देत असत. तेथील लहान मुले आमच्यात येऊन खेळत बागडत असत. आम्ही पण त्यांच्यात रमून खूप मस्ती करत असायचो. ट्रेकिंगसाठी सोबत घेऊन जात असलेल्या नवनवीन वस्तूंची ते आपुलकीने माहिती करून घेत असत.आम्हीही तेथील लहान मुलांसाठी बिस्कीट, चॉकलेट, वेफर्स, शीतपेय आदी घेऊन जात असायचो. त्यामुळे वयोवृद्धांसह छोट्या मोठ्यांशी एकदम जिव्हाळ्याचे संबंध तयार झाल्याचे समीर म्हात्रे यांनी ईटीव्ही भारत प्रतिनिधीबरोबर बोलताना सांगितले.