रायगड : मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीवर (इर्शाळगड ) येथे दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 पेक्षा जास्त लोक अडकले असल्याचे सांगितले जाते आहे. माध्यमांकडे आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 22 लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. तर दरड कोसळल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला आहे.
रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीवर येथे दरड कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये 100 पेक्षा जास्त लोक अडकले असल्याचे सांगितले जाते आहे. आतापर्यंत 22 लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. खालापूर पोलीस ठाणे हद्दीत चौक जवळील चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी एपीआय काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल नंबर 8108195554 असा आहे.
90 टक्के वाडी दरडीखाली : चौक गावापासून 6 किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्यावरील भागात आदिवासी वाडी आहे. ही दरड येथील रहिवासी घरांवर कोसळली असून 90 % वाडी ढिगाऱ्याखाली गेल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री साडेदहा ते 11 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान या वाडीमध्ये 50 ते 60 आदिवासी घरांची मोठी वस्ती होती. या गावात 30 ते 40 घरातील लोक या दरडीत अडकली आहेत. दरम्यान सतत सुरू असलेला पाऊस आणि दरड कोसळ्याच्या घटनांमुळे येथील मदत कार्यात अडचणी निर्माण होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 22 जणांना वाचवण्यात आले आहे. दरड कोसळल्याची घटना घडल्याचे कळाल्यानंतर बचाव कार्य सुरू झाले आहे. घटनास्थळी चार रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत 22 जणांना घटनास्थळावरून वाचवले आहे, मात्र अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले असावेत, अशी शक्यता आहे.
"दिवस उजाडल्यावर आम्हाला परिस्थितीची चांगली कल्पना येईल. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील 100 हून अधिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत आणि आम्हाला NDRF, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत मिळत आहे," -रायगड पोलीस अधिकारी