मुंबई: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावातील अनेक घरे दरड कोसळल्याने दबली गेली आहेत. दुसऱ्या दिवशी बचाव पथकाचे काम सुरू आहे. आमच्या चार पथकांनी कालही शोधमोहीम राबवली होती. आज आम्ही भूस्खलनग्रस्त भागाचे झोनमध्ये विभाजन करू. स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे एनडीआरएफचे कमांडंट एसबी सिंग यांनी सांगितले.
साधारण 50 ते 60 घरांची वस्ती असलेले हे गाव होत्याचे नव्हते झाले. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय आपत्ती दलाने तेथील शोध आणि बचाव कार्य संध्याकाळी थांबवले आहे. आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर गावातील 17 घरे भुईसपाट झाली असल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्यात दबलेल्यांपैकी 27 हून अधिक जणांना वाचवण्यात आले आहे.
17 घरे जमीनदोस्त : खालापूर तालुक्यांतर्गत डोंगर उतारावर वसलेल्या इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भूस्खलन झाले. गावातील सुमारे 50 घरांपैकी 17 घरे जमीनदोस्त झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या डोंगरभागात मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे इर्शाळवाडीमध्ये भूस्खलनाची घटना घडली. घटना घडल्यानंतर एनडीआरएफचे पथक बचाव कार्य सुरू झाले. मदत कार्य करण्यासाठी बचाव पथकाला अनेक अडचणी येत होत्या. इर्शाळवाडीत जाण्यासाठी कोणताच पक्का रस्ता नाही आहे. एकेक डोंगर पार करून या गावात पोहोचता येते. त्यानंतर इर्शाळवाडीत जाण्यासाठी सुमारे दीड तास लागतो. एनडीआरएफ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवसभरात भूस्खलनाच्या ठिकाणावरून 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.