महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमधील घटलेला मतदानाचा टक्का कोणाला देणार धक्का? - shirvardhan constituent assembly

सात विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरीही यंदा मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतू, मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले.

रायगडमधील घटलेला टक्क्याचा कोणाला होणार तोटा?

By

Published : Oct 22, 2019, 9:15 PM IST

रायगड - सात विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरीही यंदा मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतू, मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले.

यंदा जिल्ह्यात पुरुष मतदारांचा टक्का वाढलेला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 70.25 टक्के मतदान झाले होते. 2019 च्या निवडणुकीत 4.39 टक्क्याने मतांचा टक्का घसरला आहे. त्यामुळे या घसरलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाचा होणार हे 24 ऑक्टोबरला मतमोजणी नंतर कळणार आहे.

निवडणुकीआधी जिल्हा प्रशासनाकडून मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती करण्यात आली होती. प्रसिद्ध माध्यम, जाहिरात, पथनाट्य, बॅनरबाजी या मार्गाने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. राजकीय पक्षांनीही मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले होते. यंदा 35 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.

जिल्ह्यात अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल, उरण, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा मतदारसंघात पनवेल 54.13, कर्जत 70.81, उरण 74.32, पेण 71.28, अलिबाग 72.61, श्रीवर्धन 60.84, महाड 66.98, असे एकूण मतदान 65.86 टक्के झाले आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पनवेल 66.73, कर्जत 75.26, उरण 77.67, पेण 71.44, अलिबाग 73.05, श्रीवर्धन 62.43, महाड 67.12 एकूण 70.25 टक्के मतदान झाले होते.

यंदा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 22 लाख 66 हजार 679 मतदार होते. 2714 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. 7 लाख 82 हजार 580 पुरुष मतदार, 7 लाख 13 हजार 782 महिला मतदार आणि एक तृतीयपंथी असे एकूण 14 लाख 96 हजार 363 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

2014 च्या तुलनेत या मतदारसंघांमध्ये पनवेल 12.6, कर्जत 4.45, उरण 3.35, पेण 0.16, अलिबाग 0.46 श्रीवर्धन 1.59, महाड 0.14 ने टक्केवारी घसरली असून, 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण 4.39 टक्याने मतांची टक्केवारी घसरली आहे.

यंदाच्या निवडणुकीत घटलेला टक्का बघता प्रस्थापितांना याचा फटका पडणार की फायदा होणार याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंमध्ये विद्यमान आमदारांबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी होती. मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधा पोहचवण्यात विद्यमान आमदार कमी पडले आहेत. मतदारांमध्ये असलेली नाराजी ही मतदानावर परिणाम करणारी ठरली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी घसरल्याचे चित्र दिसत आहे. मात्र घसरलेला हा मतांचा टक्का नक्की कोणाच्या पारड्यात विजयाचे वाण टाकणार हे 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details