महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा रुग्णालयाची ४० वर्ष जीर्ण इमारत पडण्याच्या अवस्थेत?

इमारतीच्या बांधकामाला ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे इमारत जीर्ण आणि धोकादायक बनत चालली आहे.

raigad
raigad

By

Published : Jan 22, 2021, 7:03 PM IST

रायगड - जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला बांधून ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. ही इमारत जीर्ण झाली असून धोकादायक झाली आहे. असे असूनही धोकादायक इमारतीवर अंतर्गत सजावटीसाठी आतापर्यंत करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र इमारतीचा पाया हा ढासळत चालला असून गॅलरींना टेकू देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग इमारत पडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ही इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधावी, अशी मागणी आता केली जात आहेत.

१९८०साली बांधली आहे रुग्णालय इमारत

सन १९८०-८१मध्ये ही इमारत बांधण्यात आली. या दोन मजली इमारतीत सध्या अपघात विभाग, क्ष-किरण विभाग, सोनोग्राफी, डायलेसिस विभाग, स्त्री आणि पुरष सर्जिकल वॉर्ड, शस्त्रक्रीया विभाग, अतिदक्षता विभाग, औषध भंडार, कोव्हिड वॉर्ड आणि जळीत विभाग, नवजात बालक संगोपन विभाग, तसेच टेलिमेडिसीन कक्ष कार्यान्वयित आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि विभाग लक्षात घेतले तर इमारत आता अपुरी पडायला लागली आहे. त्यामुळे या इमारतीत शेकडो जणांचा नेहमी राबता सुरू असतो.

जीर्ण इमारतीवर १२ कोटी केला आहे खर्च

इमारतीच्या बांधकामाला ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे इमारत जीर्ण आणि धोकादायक बनत चालली आहे. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या आठ वर्षात इमारतीवर तब्बल १२ कोटी रुपये येवढा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र इमारतीची परिस्थिती काही सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी इमारतीला गळती लागली आहे. स्लॅब पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी टेकू लावण्याची वेळही आली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी केली जात आहे.

२०१२साली झाले आहे स्ट्रक्चरल ऑडिट

सन २०१२मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी इमारत धोकादायक झाली असून व्यापक दुरुस्तीची गरज असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या संस्थेने दिला होता. तर आरोग्य विभागाने जुन्या इमारतीची दुरुस्ती करण्याऐवजी नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र बांधकाम विभागाने आरोग्य विभागाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून जुन्याच इमारतीच्या दुरुस्तीवर भर दिला होता. आज ही इमारत जीर्ण आणि धोकादायक झाली आहे.

नव्याने स्ट्रक्चर ऑडिट करणे आवश्यक

अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयाच्या आंतर रुग्णालय विभागाचे बांधकाम १९८०साली करण्यात आले आहे. म्हणजेच इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ४० वर्ष झाली आहेत. इमारतीत छत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या इमारतीचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. बांधकाम विभागाला तशी विनंती केली आहे.

स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे निर्देश

खासदार इमारतीची इमारत जीर्ण झाली आहे. ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे बांधकाम विभागाला इमारतीची पाहाणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्याची आमदारांची मागणी

जुन्या इमारतीच्या दुरुस्तीवर दरवर्षी करोडो रुपये खर्च होत आहेत. पण इमारतीची परिस्थिती सुधरत नाही. त्यामुळे ही इमारत आता पाडून नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी आरोग्यमंत्र्याकडे केली आहे. राज्याच्या आगामी बजेटमध्ये यासाठी तजवीज व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र दळवी यांनी फोनवरून दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details