महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पक्षवाढीसाठी जिल्हा दौरा करणारे पालकमंत्री पुरस्थितीवेळी गेले कुठे?

जिल्ह्यात पूर परिस्थितीने हाहाकार माजवला आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

रवींद्र चव्हाण

By

Published : Aug 8, 2019, 5:42 PM IST

रायगड - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने आणि पूर परिस्थितीने हाहाकार माजवला आहे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना मात्र पूर परिस्थितीबाबत सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेकडे रायगडकर नाराजी व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मात्र जिल्ह्यात फिरकलेच नाही आहेत. पालकमंत्री पक्ष वाढीसाठी जिल्ह्यात येतात. परंतु, कठीण परिस्थिती उद्भवली असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील पूर भागाचा दौरा करणे आवश्यक होते. चव्हाण यांनी मात्र याकडे पाठ फिरवली.

जिल्ह्यात ४ ऑगस्टपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पेण, महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा, श्रीवर्धन, अलिबाग या तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. पेण तालुक्यातील अंतोरे, कणे, वाशी, बोर्जे, वढाव या गावाला पुराच्या पाण्याने वेढले होते. शेकडो नागरिक या पुराच्या पाण्यात अडकले होते. जिल्हा प्रशासन व पेण प्रशासनातर्फे एनडीआरएफ, कोस्टल गार्ड, स्थानिक संस्था यांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

महाड, पोलादपूर या तालुक्यात ५ दिवसांपासून पूरस्थिती आहे. याठिकाणच्या नागरिकांना एनडीआरएफ, सैन्य दल, कोस्टल पथकामार्फत सुरक्षित हलविण्यात आले. मुसळधार पावसाने अनेक भागात दरड कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details