रायगड -जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे रविंद्र चव्हाण यांचे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला
अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे, जमिनीचे, बांधबंदिस्तीचे तसेच घरे, गोठ्यांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. मोठी लहान दुधाळ, ओढकाम करणारी जनावरे इत्यादीचे नुकसान झाले आहे. दरडग्रस्त भागातील पडलेली झाडे तत्काळ काढून तेथील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, रस्ते पूर्ववत करणे तसेच आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची रोगराई पसरु नये म्हणून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
रायगडमध्ये शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सखल भागात पाणी साचल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, आर्मी व सामाजिक संस्था यांना पाचारण करण्यात आले होते. नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. आपत्तीप्रसंगी सरकारी व सामाजिक संस्था या सर्वांनीच चांगले काम केले, याचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना शासन नियमानुसार योग्य ती मदत दिली जाणार असून नुकसानीबाबतचे पंचनामे तत्काळ करुन आर्थिक मदतीसाठी तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. असे निर्देश चव्हाण यांनी दिले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील आणि विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.