महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...आणि चक्क जिल्हाधिकारी साहेबच मोटारसायकलवर आले - अलिबाग तालुक्यातील खानाव

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे खानाव हद्दीतील वेलटवाडी दरडग्रस्त गावाची पाहणी करण्यासाठी चक्क मोटर सायकलवर आले होते. स्वतः जिल्हाधिकारी पाहणी व धीर देण्यासाठी गावात आल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद होता.

रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गावाची पाहणी करण्यासाठी मोटारसायकलवर प्रवास

By

Published : Aug 12, 2019, 11:45 AM IST

रायगड -अलिबाग तालुक्यातील खानाव येथील वेलटवाडी दरडग्रस्त गाव हे डोंगरावर असल्याने तसेच वाहनांसाठी रस्ता नसल्याने त्याठिकाणी चारचाकी वाहन जात नाही. अशावेळी रायगडाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी चक्क मोटर सायकलचा आधार घेऊन दरडग्रस्त वेलटवाडी गाव गाठले.

जिल्हाधिकाऱ्यांना मोटर सायकलवर आल्याचे पाहून गावकरी अचंबित

जिल्हाधिकाऱ्यांना मोटर सायकलवर आल्याचे पाहून गावकरी अचंबित

अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी या गावातील डोंगराला भेगा पडल्याने येथील दीडशे नागरिकांना सुखरूपस्थळी हलविण्यात आले आहे. या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी खानाव येथे आपल्या शासकीय वाहनांनी गेले. मात्र वेलटवाडीवर जाण्यासाठी रस्ता चांगला नसून चारचाकी जात नसल्याचे त्यांना कळले. मात्र, जिल्हाधिकारी यांनी वेलटवाडी येथे जाण्याचे ठरवले असल्याने पर्यायी मार्ग विचारला. मोटर सायकलवर जाणे शक्य असल्याचे खानावचे माजी सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी सांगितले. गोंधळी यांच्या मोटार सायकलवर बसून किक मारायला सांगून जिल्हाधिकारी यांनी वेलटवाडी गाव गाठले. जिल्हाधिकारी यांच्या या कामाच्या पद्धतीने उपस्थित अधिकारी व ग्रामस्थही अचंबित झाले.

रायगड जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार

रायगड जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडवला आहे. त्यामुळे पूर, दरड कोसळणे, डोंगराला भेगा पडणे ही नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. रायगड जिल्ह्यातील पुरग्रत, दरडग्रस्त भागाची पाहणी स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे जातीने करून ग्रामस्थांची चौकशी करून धीर देत आहेत. त्याच्या समस्या जाणून घेत आहेत. जिल्हाधिकारी यांचे समवेत यावेळी प्रांत अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी आदी अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details