रायगड - जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी झालेले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा, पुणे यांनी दि.11 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या अहवालानुसार दोन रुग्णांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासन सक्षम असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले आहे.
21 जणांच्या तपासणीतून 4 जण पॉझिटिव्ह -
डेल्टा प्लसची लागण व त्यातून बऱ्या झालेल्या तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आली असून, उरण तालुक्यातील 44 वर्षीय महिला दि.5 जुलै 2021 रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यांना घसा खवखवणे, ताप व खोकला ही लक्षणे होती. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. त्यांचे कोविशिल्ड या करोना प्रतिबंधक लसीचे (पहिला डोस दि.25 फेब्रुवारी 2021 व दुसरा डोस दि.8 एप्रिल 2021 रोजी) दोन्हीही डोस पूर्ण झाले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही धोका नाही. श्रीमती करुणा उदय म्हात्रे यांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.