रायगड- पेण तालुक्यातील अंतोरे, कणे, बोर्जे, वाशी, वढाव या गावातील खार बंदिस्तीची कामे लवकरच करून येथील ग्रामस्थांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करणार असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पाणी कमी झाल्यानंतर त्वरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले असल्याची माहिती पत्रकारांना पाहणी दौऱयादरम्यान दिली. पेण तालुक्यातील कणे, बोर्जे, वाशी, अंतोरे, वढाव या पूरग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली. सैन्य दलाचे मेजर हिमांशू सलूजा, प्रांताधिकारी पूनम पुदलवाड, पेण तहसीलदार अरुणा जाधव, महसुलचे अधिकारी, तलाठी यावेळी उपस्थित होते.
पेण तालुक्यात देशातील सर्वाधिक 493 मिमी पाऊस पडून रेकॉर्ड झाला आहे. यामुळे तालुक्याची परिस्थिती पुरमय झाली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका हा कणे, अंतोरे, बार्जे, वाशी, वढाव या गावांना बसला. ही गावे नदीच्या व खाडीच्या मधोमध असल्याने व खारबंदिस्ती तुटली असल्याने पावसाचे पाणी, खाडीच्या भरतीचे व भोगावती नदीचे पाणी हे या गावात घुसले.
पाणी गावात घुसल्याने सारी गावे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे कणे, अंतोरे या गावातील ग्रामस्थ अडकून बसले होते. जिल्हा प्रशासनाने वेळीच पावले उचलून एनडीआरएफ व कोस्टल गार्ड यांना पाचारण करून कणे गावातील 65 जणांना सुखरूप स्थळी हलविले. अंतोरे गावातील 40 ते 50 जणांना कुंडलिका रिव्हर क्राफ्टच्या रेस्क्यू टीमने सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. या पुरामुळे या गावातील नागरिकांच्या घरातील सामानासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही पाणी हे घरासमोर साचलेले आहे.