महिला सबलीकरणासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी निधी चौधरी - रायगड तेजस्वीनी पुरस्कार न्यूज
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कुटुंबातील मुली- मुलांना समान अधिकार, समान वागणुक मिळण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी त्यांनी हत्ती, वाघ, देवमासा या प्राण्यांमध्ये स्त्री असलेले प्राणी दिशा दाखवत असल्याचा दाखला दिला.
![महिला सबलीकरणासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी निधी चौधरी raigad collector nidhi chaudhary distribute Tejaswini Award in Alibag](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10910669-115-10910669-1615124371750.jpg)
रायगड - स्त्री कधीही अबला नव्हती, निसर्गाने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती तिला दिलेली आहे. फक्त, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये परंपरा, रितीरिवाज, अंधश्रद्धांमध्ये महिलेला बंदिस्त रहावे लागलेले आहे. महिलांचे हक्क, त्यांचे अधिकार मिळवून त्यांना मान, सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. अलिबाग प्रेस असोसिएशनने आयोजित केलेल्या तेजस्वीनी पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, अलिबाग- मुरुडच्या प्रांताधिकारी शारदो पोवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी प्रदिप नाईक, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कांबळे, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नारी कल भी भारी आज भी भारी
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कुटुंबातील मुली- मुलांना समान अधिकार, समान वागणुक मिळण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी त्यांनी हत्ती, वाघ, देवमासा या प्राण्यांमध्ये स्त्री असलेले प्राणी दिशा दाखवत असल्याचा दाखला दिला. महाभारत, रामायणमधीलही दाखले दिले. परंपरेच्या जोखडाखालून मुक्त होण्यासाठी महिलांनी सामुहीक प्रयत्न करताना यास कुटुंबातील पुरुषांनीही महिलांच्या प्रयत्नांना सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात महिला मागे राहिलेल्या नाहीत. मात्र, याचे प्रमाण खूपच अल्प प्रमाणात आहे. कल भी भारी थी, आज भी भारी है, असे म्हणत प्रत्येक महिलेने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत निधी चौधरी यांनी व्यक्त केलं.