रायगड - महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे 17 जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंबं राहत होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेत सुदैवाने बचावलेल्या तरुणाने आपबिती सांगितली.
सायंकाळी व्यायाम करून आल्यानंतर मी किचनमध्ये काही खाण्यासाठी बसलो होतो. त्यावेळी फ्रिज काहीसा खाली गेल्याचे दिसले. म्हणून मी कुटुंबाला सोबत घेऊन पाचव्या मजल्यावरून ओरडत सगळ्यांना घेऊन खाली आलो. तळमजल्यावर आल्यावर इमारतीचा पिलर तुटू लागला. तर काही सेकंदात दुसरा पिलर तुटण्यास सुरुवात झाली. तेव्हा आम्ही तातडीने सर्वजण दुसऱ्या इमारतीत पोहचलो. त्यानंतर काही क्षणात इमारत जमीनदोस्त झाली. काही सेंकदाचा फरक पडला नाहीतर आम्हीही त्यात अडकलो असतो, अशी प्रतिक्रिया जावेद चिंचकर या बचावलेल्या रहिवाशी तरुणाने दिली.