महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरकाम करून 'ती' झाली बीएड, नेटाने मेहनत घेत परिस्थितीवर मात - Raigad Alibag News

अनेक जण घरची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने अर्धवट शिक्षण सोडून देतात. सरिताने आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द मनात धरली. घरकाम करीत असतानाही सरिताने कामाची लाज न बाळगता प्रामाणिकपणे काम करून आपले शिक्षणही पूर्ण केले. मनात जिद्द असेल तर, परिस्थितीवर मात करून यशाची शिडी गाठणे शक्य आहे, हे सरिताने स्वतःच्याच उदाहरणावरून दाखवून दिले आहे.

रायगड सक्सेस स्टोरी
रायगड सक्सेस स्टोरी

By

Published : Nov 18, 2020, 4:50 PM IST

Updated : Nov 18, 2020, 10:25 PM IST

रायगड - घरची हालाखीची परिस्थिती.. शिक्षणाची असलेली ओढ.. मनात ध्येय गाठण्याची इच्छा.. शिक्षक होण्याची मनात असलेली ही इच्छा घरकाम करून पूर्ण केली आहे ती सरिता पांडुरंग थळे या युवतीने. सरिता थळे हिने आपल्या जिद्दीच्या जोरावर बीए बीएड शिक्षण पूर्ण केले आहे. परिस्थिती कशीही असली तरी, मनात जिद्द असेल तर यश मिळविता येते हे सरिताने दाखवून दिले आहे. घरकाम करून शिकणाऱ्या या मुलीने नेटाने मेहनत घेत बीए, बीएडची डिग्री मिळवली आहे.

घरकाम करून 'ती' झाली बीएड, नेटाने मेहनत घेत परिस्थितीवर मात
घरची हालाखीची परिस्थिती

सरिता पांडुरंग थळे ही अलिबाग तालुक्यातील वढाव बुद्रुक, बामणगाव येथील राहणारी असून आई, वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असली तरी नववीपर्यंत शिक्षण सरिताने कसेतरी पूर्ण केले. पुढे शिक्षणाची ओढ असल्याने आणि शिक्षक होण्याची इच्छा असल्याने काहीतरी काम करून शिक्षण पूर्ण करण्याचा मनात इरादा पक्का केला होता. सरिताचे भाऊ-बहीण हे सुद्धा बारावी पास झाले असून काम करून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.

हेही वाचा -हिवाळ्यात आफ्रिकेतील मलावी हापूस बाजारात... आंबाप्रेमींची चंगळ

बाबूभाई जैन यांचा मिळाला वडिलांप्रमाणे पाठिंबा

सरिताने नववी परीक्षा दिल्यानंतर पुढील शिक्षण आपल्या मेहनतीवर करायचे, असे मनाशी ठरविले होते. त्याप्रमाणे ती अलिबाग शहरातील प्रतिष्ठित असलेले बाबूभाई जैन यांच्याकडे आपल्या मामीच्या ओळखीने घरकामासाठी गेली. त्यावेळी बाबूभाई जैन यांनी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो, तू घरी राहून अभ्यास कर, असे सांगून घरी पाठविले. मात्र सरिताने आत्मनिर्भर होण्याच्या हेतूने दुसऱ्या दिवशी बाबूभाई यांना भेटून मी घरकाम करून समोरच असलेल्या शाळेत जाईन, असे सांगितले. सरिताची काम करून शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द पाहून बाबूभाई आणि त्यांचे कुटुंब खंबीरपणे सरिताच्या पाठिशी उभे राहिले. सरिताला आपली मुलगी या नात्याप्रमाणेच जैन कुटूंबाकडून सन्मान मिळत आहे. त्यामुळे जैन कुटुंबाचाही सरिताच्या यशाला महत्त्वाचा हातभार मिळाला आहे.

सरिता झाली बीए, बीएड

सरिता मुळातच हुशार असल्यामुळे हालाखीची परिस्थिती असतानाही एक-एक यशाची पायरी चढून आज तिने यश मिळवले आहे. जैन कुटुंबाकडे सरिता दहा वर्षांपासून राहून घरकाम, चविष्ट स्वयंपाक, घरात येणाऱ्या पाहुण्यांचे तसेच कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आदरातिथ्य त्याच्या आवडी-निवडी, औषध या गोष्टी सांभाळून कामातून वेळ काढून आपला अभ्यासही करीत होती. दहावी, बारावी, पदवी आणि बीएड शिक्षण पूर्ण करताना तिला जैन कुटुंबासह, शिक्षक, मित्र-मैत्रिणी याचे सहकार्य अभ्यासात मिळाले. पीएमपी महाविद्यालयातून सरिताने बीएड पूर्ण केले आहे. तसेच आता एमए पदवी घेण्याचा तिचा विचार आहे.

परिस्थितीने डगमगून न जाता यश मिळवता येते

अनेक जण घरची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने अर्धवट शिक्षण सोडून देतात. सरिताने आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द मनात धरली. घरकाम करीत असतानाही सरिताने कामाची लाज न बाळगता प्रामाणिकपणे काम करून आपले शिक्षणही पूर्ण केले. मनात जिद्द असेल तर, परिस्थितीवर मात करून यशाची शिडी गाठणे शक्य आहे, हे सरिताने स्वतःच्याच उदाहरणावरून दाखवून दिले आहे.

हेही वाचा -प्लास्टिक खुर्ची मोडल्याच्या वादातून शेजाऱ्यावर सुरीने हल्ला, दोन भावांविरोधात गुन्हा दाखल

Last Updated : Nov 18, 2020, 10:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details