रायगड - 108 रुग्णवाहिका चालकांच्या कामबंद आंदोलनामुळे रायगड जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. 'बिव्हीजी' कंपनीच्या माध्यमातून शासनाकडून 'डायल 108' ही रुग्णवाहिका सेवा मोफत दिली जाते. जिल्ह्यात अशा 22 रुग्णवाहिका आहेत. मात्र, त्यावरील चालकांना या महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
चालकांच्या आंदोलनामुळे रायगडमधील 108 रुग्णवाहिका सेवा ठप्प हेही वाचा - दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार
आठ महिन्यापूर्वीही 108 चालकांनी पगार मिळत नसल्याने संप पुकारला होता. रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांना आधीच तुटपुंजा पगार मिळतो असून, तो देखील वेळेवर मिळत नसल्याने चालक त्रस्त झाले आहेत. यापूर्वीही 2 वेळा त्यांनी अशाच प्रकारे आंदोलन केले होते. रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक सेवेबाबतही शासनाची उदासीनता यातून दिसून येत आहे. इतर चालकांप्रमाणे आम्हाला समान वेतन द्यावे आणि तेदेखील वेळेवर मिळावे अशी चालकांची मागणी असून पगार मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - धुळे जिल्हा परिषद : अध्यक्षपदी तुषार रंधे यांची बिनविरोध निवड