रायगड- पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गॅस दरवाढ, रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ, तसेच चक्रीवादळात न झालेली मदत यामुळे केंद्र सरकारविरुध्द राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. खोपोली शहराच्या वतीने शुक्रवार दि.21 मे रोजी खोपोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील प्रारंगणात कोरोना नियमांचे पालन करत केंद्र सरकारच्याविरोधात घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देण्यात आले.
खोपोलीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा जाहिर निषेध 'कोरोनाने वाचलो अन महागाईने मेलो'
'देश मे मोदी है - तो महंगाई है, कोरोनाने वाचलो अन महागाईने मेलो' अशा घोषणा व नारेबाजीतून केंद्र व मोदी सरकारचा निषेध व निदर्शने करण्यात आले. 'चुलीत घाला तुमची प्रधानमंत्री उज्वला योजना' असा नाराजीचा सूरही यावेळी महिलांनी काढला. जीवनावश्यक वस्तूंचे दिवसेंदिवस भाव वाढ होत आहे व मुख्यतः गॅस दरवाढ आकाशाला भिडत असल्याने, घरगुती आर्थिक बजेट कोलमडत आहे. यासाठी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला गेला.
सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम
कोरोनामुळे देशातील जनता हवालदिल झाली आहे. केंद्राकडून दिलासा देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले जात आहे. कोरोनापासून रक्षणासाठी आवश्यक सॅनिटायाझरसह विविध वस्तूंवर जीएसटी कायम आहे. हा माफ करून दिलासा देणे शक्य आहे. त्याचा विचार करण्याऐवजी सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम चालले आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ सातत्याने केली आहे. लॉकडाऊनमुळे इंधनाचा वापर कमी झाला तरी, माल वाहतूक सुरू असल्याने इतर वस्तूंचे भाव वाढले. कोरोना व अन्य संकटामुळे शेतकरी आधीच त्रस्त झाले आहेत. नवीन हंगामाच्या तयारीची चिंता असताना सरकारने खतांचे दर वाढवले. आधीच शेतातून उत्पन्न कमी, त्यात खर्चात वाढ होत आहे. या सर्व स्थितीचा विचार करून केंद्राने दरवाढ तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी दत्ताजीराव मसुरकर यांनी केली असून, केंद्र सरकारने याबाबत विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा मसुरकर यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित
यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, नगराध्यक्षा सुमनताई औसरमल, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अतुल पाटील, महिला शहराध्यक्ष सुवर्णा मोरे, नगरसेवक मोहन औसरमल, कुलदीपक शेंडे, रमेश जाधव, ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख, शिरीष भिवरे, सुधीर तेंडुलकर, विनोद राजपूत, संजय गायकवाड, मनीष यादव, राष्ट्रवादी युवक विद्यार्थी निखिल पालांडे, माजी नगरसेवक सचिन मसुरकर, दिनेश गुरव, राजेंद्र फक्के, इंद्रसेन घोडके आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -गडचिरोलीत पोलीस-नक्षल्यांदरम्यान चकमक, 13 नक्षल्यांना कंठस्नान