रायगड - सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे. सत्र न्यायालयाने गेल्या तारखेला खटल्यातील आरोपी विरोधात कलम निश्चित केले होते. या कलमाविरोधात आरोपींना उच्च न्यायालयात अपील करायचे आहे. याबाबत आरोपीच्या वकिलांनी अर्ज केला आहे. या अर्जाबाबत विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करून आक्षेप घेतला आहे. याबाबतची सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे.
अश्विनी बिद्रे खून खटला : आरोपीच्या उच्च न्यायालयात अपिल करण्यावर सरकारी वकिलांचा आक्षेप
पोलीस सहायक निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणी सत्र न्यायालयाने गेल्या तारखेला खटल्यातील आरोपी विरोधात कलम निश्चित केले होते. या कलमाविरोधात आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला आहे.
अलिबाग येथील सत्र न्यायाधीश आर. जी मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात अश्विनी बिद्रे खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. 24 जून रोजी या खटल्यातील चारही आरोपीवर न्यायालयाने कलम निश्चित केले आहेत. आज न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाने ठरविलेल्या कलमाविरोधात उच्च न्यायालयात अपील करावयाचे असून तारीख वाढवून देण्याबाबत अर्ज केला. तर आरोपी हजर राहणार नाहीत, असे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मात्र काही वेळाने चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपीच्या वकिलांनी केलेल्या या अर्जाबाबत न्यायालयाने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत याना युक्तिवाद करण्यास सांगितला. यावेळी अॅड. प्रदीप घरत यांनी उच्च न्यायालयाने अश्विनी बिद्रे खटला जलदगतीने चालविण्याचे सांगितले आहे. असे असताना आरोपी हे खटला लांबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा युक्तिवाद करून आरोपीच्या अर्जावर आक्षेप घेतला. या खटल्याची सुनावणी 18 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.