पनवेल- पनवेल महापालिकेच्या शिक्षण विभागात उपशिक्षिका म्हणून काम करण्याऱ्या एका शिक्षिकेने पनवेल पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर व वरिष्ठ लिपिक नामदेव पिचड यांच्याकडून होणाऱ्या मानसिक व छळवणूकीविरोधात पनवेल महापालिकेवर मोर्चा काढला होता. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेनेही या शिक्षिकेला पाठिंबा जाहीर करत मोर्चात सहभाग घेतला. पनवेल महापालिकेचे उपायुक्त लेंगरेकर यांनी पालिका शिक्षण विभागात दडपशाही आणि दहशत निर्माण केली असून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करावी, अन्यथा 1 लाख शिक्षकांचा मोर्चा मुंबईत काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेमार्फत राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.
रायगड जिल्हा परिषदेकडून समायोजन करण्यात आलेल्या उपशिक्षिका ज्योत्स्ना घरडा यांची 2 वर्षांत 4 वेळा बदली करण्यात आली आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देण्यासाठी या बदल्या केल्या असल्याची घरडा यांची तक्रार आहे. लेंगरेकर यांनी आपला मानसिक छळ केल्याबद्दल व वरिष्ठ लिपिक नामदेव पिचड यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करावे आणि त्यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी घरडा यांनी केली होती. त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटने राज्याध्यक्ष अर्जुन कोळी, जिल्हा अध्यक्ष बाबुराव पालकर, तालुका अध्यक्ष वसंत मोकल, प्रमोद लांगी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.