रायगड -पेणमधील बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला जोपर्यंत फासावर लटकवत नाही, तोपर्यंत पेणमधील जनता गप्प बसणार नाही. पेणमधील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, महिला वर्ग, पेणकर हे पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहोत, असा आवाज पेणकर यांनी निषेध मोर्च्याच्या माध्यमातून दिला आहे.
बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेणमध्ये झालेल्या दुर्देवी आणि निंदनीय घटनेबाबत आज पेण बंदची हाक दिली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पेणकरांनी दिला. पेणमधील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, आदिवासी महिला, पेणकर यांनी शहरात निषेध मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला. पेण बंदमुळे सर्व बाजारपेठांमधील दुकाने 100 टक्के बंद ठेवण्यात आली होती.
गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची महिलांनी घेतली भेट
पेण बंदची हाक आज दिली असल्याने शेकडो महिलांनी निषेध मोर्चा काढला होता. देसाई यांनी आज पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. गृह राज्यमंत्री पेणमध्ये आल्यानंतर महिलावर्गाने त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री यांचा प्रतिनिधी म्हणून पीडित कुटुंबाला आधार दिला आहे आणि आरोपी सुटणार नाही, असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले आहे.
आरोपीला फासावर लटकवेपर्यंत लढा सुरूच
तीन वर्षीय मुलीची निर्दयीपणे बलात्कार करून हत्या केल्याबाबत पेणमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत आरोपीला फासावर लटकवत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. पीडित कुटुंबाच्या पाठीशी पेणकर ठामपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी दिली आहे.