रायगड - आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपण पाहतो. म्हणूनच 'मुलगी शिकली प्रगती झाली' असे आपण म्हणतो. हल्ली महिला विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करताना आपण पाहत असतो. रायगडच्या माणगाव तालुक्यातील साळवे गावची कन्या प्रिया बाबुराव तेटगुरे हिला कोकण रेल्वेमध्ये पहिली महिला इंजिन चालक होण्याचा मान मिळाला आहे. सर्व कोकणवासीयांना प्रियाचा अभिमान वाटत असून सोशल मीडियावर सध्या या कोकण कन्येचे जोरदार कौतुक होत आहे. प्रियाचे रेल्वे चालवितानाचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रिया कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील मुख्य कार्यालयात रुजू झाल्यानंतर तिने रेल्वे इंजिन चालविण्याचे वर्षभर प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या कोकण कन्येला महिला म्हणून रेल्वे चालविण्याचा पहिला मान मिळाला आहे. प्रियाचे वडील माणगाव रेल्वेस्थानकात बुकिंग क्लार्क म्हणुन कार्यरत आहेत. आपल्या या कर्तृत्ववान मुलीचा त्यांना आभिमान वाटत असल्याचे ते सांगतात. प्रियाचे संपूर्ण इंजिनियरींगचे शिक्षण रत्नागिरीतच झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.