रायगड - विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून, आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शेकापला एकही जागा मिळवता आली नाही, तर काँग्रेस पक्षाचीही तीच अवस्था झाली आहे. रायगडमधील या बदललेल्या राजकीय परिस्थितीत आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील चित्र बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर रायगडमधील राजकीय स्थिती बदलणार? - रायगडमधील जिल्हा परिषद निवडणुका
रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस अशी सत्ता आहे. शिवसेना, भाजप हे विरोधी बाकावर बसलेले आहेत. मात्र, विधानसभेनंतर बदललेली राजकीय परिस्थिती जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडवेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एक महिन्यांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुती कोणता चमत्कार करून जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी प्रयत्नशील राहील? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अलिबाग, महाड, कर्जत (शिवसेना), पेण, पनवेल (भाजप), उरण ( अपक्ष), श्रीवर्धन ( राष्ट्रवादी काँग्रेस) या ठिकाणी राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे प्राबल्य वाढले आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस अशी सत्ता आहे. शिवसेना, भाजप हे विरोधी बाकावर बसलेले आहेत. अडीच वर्षे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित झालेल्या आमदार अदिती तटकरे यांच्याकडे आहे. पुढील अडीच वर्षे हे शेकापकडे अशी बोलणी आघाडीमध्ये झालेली आहे. आघाडीकडे संख्याबळ असल्याने अध्यक्ष हा आघाडीचाच होऊ शकतो. मात्र, विधानसभेनंतर बदललेली राजकीय परिस्थिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडवेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3, भाजप 3 असे एकूण 59 सदस्य संख्या आहे. आघाडीचे 38 तर महायुतीचे 21, असे संख्याबळ आहे. त्यामुळे अध्यक्ष हा आघाडीचाच बसण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी शिवसेना भाजप काय खेळी खेळतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.