रायगड - तीन महिन्यांपूर्वीच अलिबाग येथे बदलीवर आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (वय 50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 16 ऑगस्ट रोजी रात्री पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात ही खळबळजनक घटना घडली.
आत्महत्येपूर्वी प्रशांत कणेरकर यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मात्र, त्यात काय लिहिले आहे याबाबत पोलीस गुप्तता पाळत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील कारण चिठ्ठीतील मजकूर वाचल्यावरच स्पष्ट होणार आहे. या घटनेने मात्र जिल्हा पोलीस दल हादरून गेले आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात प्रशांत यांच्या खोलीच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी गेले असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे ते झोपले असतील म्हणून स्वच्छता कर्मचारी निघून गेले. कणेरकर यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते फोनही उचलत नव्हते. म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर अलिबाग पोलीस दाखल झाल्यानंतर दरवाजा तोडून आत गेले. त्यावेळी कणेरकर हे मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मृतदेहाचा पंचनामा करताना प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.