महाराष्ट्र

maharashtra

पेणमध्ये दोन दरोडेखोरांना अटक, चार दरोडेखोर फरार

By

Published : Jul 27, 2019, 8:17 AM IST

दरोडा टाकणाऱ्या पाच दरोदेखोरांपैकी दोन दरोडेखोरांना पकडण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. सुभाष मोहन पवार (वय ४२, रा.राम नगर, नांदेड) व अनिल सिंग गुलाब सिंग दुधानी (रा. अंबरनाथ) या दोन आरोपींना पेण पोलिसांनी अटक केली आहे.

दरोडे खोरांनी चोरलेली गाडी

रायगड- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना सिने स्टाईलने पाठलाग करुन पकडण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. मात्र, चार दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांकडून फरार दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान पेण-खोपोली मार्गावरील आंबेगाव येथील पेट्रोल पंपासमोर घडली.

घटनेबद्दल माहिती देताना 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी

सुभाष मोहन पवार (वय ४२, रा.राम नगर, नांदेड) व अनिल सिंग गुलाब सिंग दुधानी (रा. अंबरनाथ) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींकडून पोलिसांना एक मारुती इको गाडी, चार कटावणी, दोन चाकू, गॅस कटर, दोन सिलेंडरचे बाटले, सुरा, लोखंडी पाने, (एमएच ०५ / एस २०३९) या क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी, असा एकूण ११ लाख ४ हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. या आरोपींच्या नावे पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई येथे जबरी दरोडे दाखल असून हे आरोपी काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण म्हाडा कॉलनी येथे राहणारे भिडे यांची नवीन मारुती इको गाडी गुरुवारी रात्री त्यांच्या घरा समोरून चोरीला गेली होती. या बाबत पेण पोलिसांचा तपास सुरू असताना सदर गाडी शुक्रवारी रात्री पेण शहरातील महाडीक वाडी, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, बाजार पेठेतील सुभाष कॉर्नर येथे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पेण पोलिसांनी या गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांना ही गाडी पेण - खोपोली रस्त्यावरील बायपास रस्त्यावर आढळून आली. पोलिसांनी या संशयित गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही गाडी पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका ट्रेलरला मागून धडकली. यावेळी गाडीत असलेल्या सहा दरोडेखोरांनी पोलिसांवर चॉपरने हल्ला करुन पळ काढला. पोलिसांनी देखील स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. दरोडेखोरांनी चोरलेल्या गाडीत धारदार सुरे, चॉपर, गुप्ती अशी हत्यारे देखील आढळून आली आहेत.

या झटापटीत पोलिसांना दोन दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. मात्र, उर्वरित चार दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता या चार दरोडेखोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आंबेगाव येथील जंगलात पलायन केले. पेण पोलिसांसह रायगड पोलिसांचे पथक या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उप पोलीस अधीक्षक नितीन जाधव, पेण पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. मात्र, चार फरार दरोडेखोर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details