रायगड - रायगडच्या पोलीस प्रशासनासह रायगडची सुरक्षा सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलिसांना दुर्गम भागात तसेच समुद्र किनारी टेहळणी करताना अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा नियोजन योजनेच्या मंजूर निधीतून 13 वाहने आणि 10 मोटार सायकल देण्यात आल्या आहेत. तर, कोरोनाच्या संकट काळात महिला आणि बालकांना रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने 6 रुग्णवाहिका जिल्ह्याला प्राप्त झाल्याची अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. पोलीस वाहनांचा आणि रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज पार पडला त्यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील 'आरटीपीसीआर' ऑनलाईन रिपोर्ट यंत्रणेचे आणि 'जनरेशन ऑक्सिजन प्लांट'चे उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार अनिकेत तटकरे, राजीप अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यावेळी उपस्थित होते.
'जिल्हा पोलीस दल गतिमान करणार'
रायगड जिल्ह्याला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचबरोबर दुर्गम असा डोंगराळ भागही आहे. या ठिकाणी दिवसरात्र पोलिसांना गस्त घालावी लागते. अशावेळी वाहने ही उत्तम असणे गरजेचे आहे. जिल्हा वार्षिक आराखडा योजनेअंतर्गत जिल्हा पोलीस दलासाठी नवीन वाहने खरेदी करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून 4 क्वालिस, 9 बोलेरो आणि 10 मोटार सायकल खरेदी करण्यात आल्या असून, त्या आज पोलीस दलात दाखल झाल्या आहेत. चक्रीवादळात नुकसान झालेल्या चौकीची दुरुस्ती, पोलीस मैदानाला संरक्षण भिंत, पोलीस इमारत सक्षम करण्याचे काम जिल्हा नियोजन मार्फत करण्यात येणार आहेत असे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.