रायगड - कोरोनामुळे उघडकीस आलेल्या एसटी पास घोटाळ्यातील आरोपी वाहक जनार्दन गंगाराम म्हात्रे, जितेंद्र जयेंद्र देशपांडे, रमेश भाऊराव पाटील या ३ आरोपींवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात आणखी एका महिला वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. तर एका महिला लेखाकारावर (अकाउंटंट ) आरोपपत्र देण्यात आले आहे.
पेण येथील एसटी आगारात घडलेल्या लाखो रुपयांच्या एसटी पास घोटाळा प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या आता ५ झाली आहे. त्यात २ महिलांचाही समावेश आहे.
पेण येथील एसटी आगारात प्रवाशांना पास देताना पासच्या ३ प्रती बनविण्यात येतात. त्यापैकी १ प्रत प्रवाशाला व दुसरी प्रत अकाउंट विभागाला तर तिसरी प्रत पेण आगार कार्यालयात ठेवण्यात येते. परंतु प्रत्यक्षात मात्र तिसरी प्रत कोरी ठेवून ती दुसऱ्याच प्रवाशांना दिली जात होती व त्या रकमेची अफरातफर करण्यात येत होती. या प्रकरणात आणखीन एक वाहक भक्ती पाटील यांच्या कारकिर्दीतही पासची प्रत कोरी भेटल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.