पनवेल - दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरासह पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी गुढी उभारून नव्या वर्षाचे स्वागत करण्याबरोबरच अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास शोभायात्रा काढल्या. नववर्ष स्वागत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मराठी परंपरांची खास झलक पाहायला मिळाली. तर, या शोभा यात्रांचा प्रचारासाठी राजकीय उपयोग कसा होईल, याकडे नेत्यांचा कल राहिल्याचे चित्र दिसून आले.
संपूर्ण पारंपरिक वेशातील तरुण आणि महिला या ढोल ताशा पथकामध्ये दिसून आल्या. तर काही जणींनी आपल्या मराठी मातीतील कसरतीचे प्रदर्शन केले. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्याच नागरिकांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त सर्वच राजकीय पक्षांनी गाठला. पनवेलमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.