महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्लास्टिक बंदी धाब्यावर; पालिका उपायुक्तांची धडक कारवाई

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारी राज्यातील पहिली महानगरपालिका होण्याचा मान पनवेल महापालिकेने मिळवला. मात्र, असे असले तरी तेथे अनधिकृतपणे प्लास्टिकचा वापर होत होता. यामुळे महापालिका उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी स्वतः पनवेल मार्केटमध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई करत ५० हजारांचा दंड वसूल केला.

उपायुक्त संध्या बावनकुळे

By

Published : Feb 1, 2019, 12:22 PM IST

ठाणे - महापालिकेने प्लास्टिक बंदीचा मोठा गाजावाजा करत निर्णय घेतला. त्यानंतर प्लास्टिकचा वापर करणारे व्यापारी तसेच फेरीवाले यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला. यासाठी एका पथकाची नेमणूकही करण्यात आली. मात्र, काही कालावधीनंतर पालिकेने याकडे कानाडोळा केल्यामुळे अनेक व्यापारी आणि फेरीवाल्यांनी प्लास्टिक बंदीचा आदेश धाब्यावर बसवत प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे सुरू केला. यामुळे बंदीची थंडावलेली कारवाई पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. महापालिका उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी स्वतः पनवेल मार्केटमध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई करून जवळपास ५० हजारांचा दंड वसूल केला आहे.

महापालिकेने पर्यावरणावर आघात करणाऱ्या प्लास्टिक पिशव्या नष्ट करण्यासाठी पालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदी केली. विशेष म्हणजे अशाप्रकारे प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारी राज्यातील पहिली महानगरपालिका होण्याचा मान पनवेलने मिळवला. प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या दुकानदार आणि फेरीवाल्यांवर मनाने वचक ठेवण्यासाठी महानगरपालिका नेहमीच विशेष मोहीम राबवत असते. त्याचाच भाग म्हणून आज पनवेल मार्केटमध्ये स्वतः पालिका उपायुक्त बावनकुळे यांनी प्लास्टिक बंदी कारवाई करत ५० हजारांचा दंड वसूल केला. पालिका हद्दीत अशी कारवाई नेहमीच सुरू ठेवण्यात येणार आहे. दुकानदार आणि नागरिकांनी स्वतः पालिकेच्या आणि राज्याच्या प्लास्टिक बंदी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.

प्लास्टिकच्या वापरावर पहिली कारवाई झाल्यास ५ हजार तर दुसर्‍या कारवाईत १० हजार आणि तिसर्‍या वेळी कारवाई झाली तर २५ हजार आणि शेवटी दुकानाचे लायसन्स जप्त करून ३ महिने कारावास असे या दंडाचे स्वरूप आहे. यापुढेही फेरीवाले तसेच व्यापारी प्लास्टिकचा वापर करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details