लग्नाकार्य लांबणीवर गेल्याने फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी व्यावसायिक आर्थिक अडचणीत - कोरोना परिणाम
मार्च ते जून हे चार महिने लग्न सोहळ्यासाठी महत्वाचे असतात. कारण, अनेक जण या महिन्यात लग्नसोहळा संपन्न करत असतात. लग्नाची तारीख ठरल्यानंतर वर-वधूकडील नातेवाईक हे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफी करणाऱ्यांना आधीच ठरवून ठेवतात. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे महिने धावपळीचे असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नसमारंभ हे लांबणीवर गेल्याने त्याच्याशी संलग्न असणाऱ्या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी व्यवसायाला घरघर लागण्याची वेळ आली आहे.
रायगड - मार्च ते जून हे महिने लग्न सोहळ्याचे असल्याने फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांचे हे कमाईचे महिने असतात. या चार महिन्यात फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर हा आपली वर्षभराची कमाई करत असतो. मात्र, यंदा या फोटोग्राफीच्या व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण लागले असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटाची छाया पसरली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नसमारंभ हे लांबणीवर गेल्याने त्याच्याशी संलग्न असणाऱ्या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी व्यवसायाला घरघर लागण्याची वेळ आली आहे. रायगड जिल्ह्यात या व्यवसायाला 7 ते 8 कोटीचा आर्थिक फटका बसल्याची माहिती रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओ असोसिएशनचे अध्यक्ष विवेक सुभेकर यांनी सांगितले आहे. फोटोग्राफी व्यवसायाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही असोसिएशनमार्फत करण्यात आली आहे.