नवी मुंबई- जीवनावश्यक वस्तूमध्ये मोडल्या जाणाऱ्या भाजीपाला खरेदीसाठी बुधवारी पनवेलच्या बाजार समितीत प्रचंड गर्दी झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या, तरी नागरिकांना कसलेच गांभीर्य नाही. यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदीची पायमल्ली नागरिकांतर्फे केली जात असल्याचे दिसून आले.
संचारबंदीची पायमल्ली, पनवेलच्या बाजार समितीत नागरिकांची तुफान गर्दी....
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदी असतानाही पनवेलच्या बाजार समितीत नागरिकांनी संचारबंदीची पायमल्ली करत तुफान गर्दी केली.
संचारबंदीची पायमल्ली, पनवेलच्या बाजार समितीत नागरिकांची तुफान गर्दी....
जमावबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तू सोडता सर्व बाजारपेठा व इतर दुकाने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे असतानाही बाजार समितीत काही नागरिकांनी काहीच गांभीर्य लक्षात न घेता खरेदीसाठी गर्दी केली. नागरिकांनी सुरक्षेसाठी मास्क, रुमालही बांधलेले नव्हते. या गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे बाजारात पोलिसांची सुरक्षा नसल्याने या गर्दीवर कुठलेही नियंत्रण नव्हते.